नागपूर :नागपूर : मला नागपूरला येण्याची संधी मिळते, त्या प्रत्येक वेळी मी दीक्षाभूमी इथं जाऊन नतमस्तक होतो. त्यातून मला भाजपासारख्या बलाढ्य शक्तींविरोधात काम करण्याची प्रेरणा मिळते, असं उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढलं आहे. राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे. मात्र, या तीन इंजिन सरकारचं केंद्रातील मोठ्या इंजिनच्या सरकारपुढं काही चालते का? असा सवालही रोहित पवार यांनी यावेळी केला. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी नागपूरला आले असता, रोहित पवार बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून भाजपा न्यायालयात :ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला होता, तेंव्हा भाजपाचेचं लोकं कोर्टात गेले होते. आता मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, म्हणून भाजपाचे लोकं कोर्टात गेल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. मराठा आरक्षणात भाजपा दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
व्हायरल व्हिडिओचा निषेध : बोलायचं आणि मोकळं व्हायचं, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकार परिषेदपूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, त्या व्हिडिओचा मी निषेध करतो. बोलायचं आणि मोकळं व्हायचं, म्हणजे त्यात राजकारण केलं जात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर सिरियस नसणारे नेते, हे फक्त पद मिळवण्यासाठी सिरियस असतात, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.