नागपूर: शहरातील नेहरू पुतळा बारदाना गल्ली येथे बंदुकीचा धाक दाखवून लूटमार झाल्याची घटना घडली आहे. चोरट्याने बंदुकीचा धाक दाखवून विरम पटेल नावाच्या व्यापाऱ्याचे 1 कोटी 15 लाख रुपये आणि दुचाकी पळवली. ही घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
दुकान बंद केल्यानंतर झाली चोरी: याप्रकरणाची माहिती अशी की, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाजारात बऱ्यापैकी गर्दी होती. नेहरू पुतळ्याजवळील बारदाना गल्लीत विरम पटेल नामक एका व्यापाऱ्याचे दुकान आहे. त्यांनी रोजचा व्यवहार पूर्ण केल्यानंतर दुकान बंद केले. 1 कोटी 15 लाख रुपयांनी भरलेली बॅग दोन कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली. कर्मचाऱ्यांनी रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. ते दुकानाकडून निघाले. काही अंतरावर एका आरोपीने त्यांची दुचाकी अडवली. आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत दुचाकीसह 1 कोटी 15 लाखांची रोकड पळवली.
कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर आरोपींची नजर-यासंदर्भात लकडगंज पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटना मोठी असल्यामुळे अतुल सपने त्यांनी तात्काळ वरिष्ठांना या संदर्भात सूचित केले. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त आश्वती दोरजे या देखील घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. रात्री उशिरा बॅग लिफ्टिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी काही पथके तयारी केली आहेत. चोरीचा घटनाक्रम लक्षात घेतला तर आरोपीला विरम पटेल यांची पूर्ण माहिती होती. कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर देखील आरोपीची बारीक नजर होती, अशी पोलिसांनी माहिती दिली.
व्यापाऱ्याने गमावले तब्बल 58 कोटी रुपये :काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्यानेऑनलाइन गेमच्या नादात तब्बल 58 कोटी रुपये गमावल्याची घटना घडली होती. या व्यापाऱ्याने नोव्हेंबर 2021 ते 2023 दरम्यान विविध प्रकारच्या ऑनलाइन गेमच्या नादात 58 कोटी रुपये गमावले. दरम्यान पोलिसांनी गोंदिया येथे आरोपीच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी आरोपीच्या घरात मोठी रक्कम जप्त केली. अनंत जैन असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा-
- Jalna Crime News : टक्कल असताना डोक्यावर केसांचा विग लावून करायचा चोऱ्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- Crime News : अपघातात मुलाचा मृत्यू; जमावाने केली ट्रॅक्टर चालकाची हत्या