नागपूर -राज्य शासनाकडून महिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, रेल्वे विभाग व केंद्र शासनाकडून अद्यापही स्पष्टीकरण दिलेले नाही. यावरूनच भाजपची महिलांबाबत दुटप्पी भूमिका आहे. राज्य शासनाने प्रवासाला परवानगी दिल्यानंतरही केंद्र शासन मात्र नाकारत आहे. त्यामुळे नवरात्रीत महिलांना सन्मानपूर्ण वागणूक द्यावी, अशी भूमिका भाजपची दिसून येत नाही, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्य शासनाकडून लोकलमध्ये महिलांनाही प्रवासाकरिता परवानगी देण्यात आली. मात्र, रेल्वे विभाग व केंद्र शासनाकडून ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टिका केली. एकीकडे राज्य शासनाने महिलांसाठी प्रवास करण्याची परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली आणि दुसरीकडे रामलीलासाठी राज्य शासनाकडे परवानगी मागायची, ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे भाजप नवरात्रीच्या पवित्र काळातही महिलांच्या मुद्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप मंत्री वडेट्टीवार यांनी केला आहे.