नागपूर - काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्यावर सुषमा स्वराज आणि माझ्यामध्ये बोलणे झाले होते. लवकरच नागपूरला येणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, अशा शब्दात राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेंढे यांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सुषमा स्वराज लवकरच नागपूरला येणार होत्या - प्रमिला मेंढे - राष्ट्र सेविका समिती
मातृत्त्वभाव काय असतो? हे सुषमा स्वराज यांच्याकडून शिकण्यासारखे होते. देवाने त्यांच्यासाठी दुसरे परराष्ट्र मंत्रालय बनवले असावे. म्हणूनच त्यांना बोलावून घेतले, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेंढे यांनी यावेळी दिली.
सुषमा स्वराज या राष्ट्र सेविका समितीच्या आजन्म सद्स्य होत्या. त्यांनी संघाच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांचे प्रमिला यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यांच्याविषयी बोलताना प्रमिला म्हणाल्या, सुषमा स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करताना परदेशात भारताची प्रतिमा उंचावली. त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी आजच्या राजकारणात पाहायला मिळत नाही. एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील त्यांनी राष्ट्र सेविका समितीच्या नियमाचे सदैव पालन केले. एवढेच नाहीतर त्या सामान्य सेविकांप्रमाणे जमिनीवर बसत होत्या. त्यांनी पदाचा कधीही मोठेपणा दाखवला नाही. त्यांच्यातील मातृभाव सदैव स्मरणात राहणारा आहे.
मातृत्त्वभाव काय असतो? हे सुषमा स्वराज यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांनी विदेशातील अनेक भारतीयांना मदत केली. त्यांची कार्यशैली देश कधीही विसरू शकणार नाही. देवाने त्यांच्यासाठी दुसरे परराष्ट्र मंत्रालय बनवले असावे. म्हणूनच त्यांना बोलावून घेतले, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रमिला यांनी यावेळी दिली.