नागपूर - सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिण्याचा कांगावा काँग्रेस करीत आहे. मात्र, महात्मा गांधींनी सुद्धा इंग्रजांना पत्र लिहिले होते, हे त्यांनी विसरू नये, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले. इंग्रजांना पत्र लिहून मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे खुद्द महात्मा गांधी यांनी म्हटले असल्याचा दावा देखील रामदेवबाबा यांनी केला. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते.
'महात्मा गांधींनीही इंग्रजांना पत्र लिहिले होते हे सावरकरांना विरोध करणाऱ्यांनी विसरू नये'
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वाद रंगला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. आता यामध्ये योगगुरू रामदेवबाबा यांनी सुद्धा उडी घेतली आहे.
इंग्रजांना सावरकरांनी लिहिलेल्या पत्राबद्दल आरोप करणारी काँग्रेस महात्मा गांधी यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रावर गप्प का बसते? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उफस्थित केला. सावरकरांनी इंग्रजांना त्यांच्या रणनितीचा भाग म्हणून पत्र लिहिले होते. कारण त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन इंग्रजांविरोधात लढा द्यायचा होता. मात्र, महात्मा गांधी यांनी इंग्रजांना पत्र लिहून इंग्रजांना मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर काँग्रेस काहीच बोलत नाही, असा आरोप रामदेव यांनी केला.
सावरकरांना भारतरत्न दिलाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तसेच राम मंदिर बनणे गरजेचे आहे. मोदी, शाह ही जोडीच त्याचे निर्माण करणार असल्याचे रामदेव म्हणाले.