नागपूर-जिल्ह्यात येत्या १७ जानेवारीला शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओ ही मोहीम १७ जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. त्याकरिता नागपूर महानगर वगळता जिल्हा परिषद नागपूर आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यात १७ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण; प्रशासनाची तयारी सुरू
१७ जानेवारीला राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी नागपूर महानगर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये २३ लक्ष ६२ हजार २५९ लोकसंख्या आहे. यामध्ये पाच वर्षाखालील बालकांची संख्या दोन लक्ष हजार ५८० आहे. या सर्व बालकांना १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.
मोबाईल पथक सक्रिय
महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके यांना मोबाईल पथकाद्वारे पोलिओ लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या मोहिमेसाठी ग्रामीण भागात असणारी सर्व शासकीय यंत्रणा सहभागी होणार आहे. या शिवाय या कार्यक्रमाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नियोजन-
या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना तालुक्यांचे वाटप करण्यात आले आहे. आज यासंदर्भात जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली. तालुका टास्क फोर्स सभा, पर्यवेक्षक, बुथवरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध सार्वजनिक उपक्रम राबवून हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गावांमधील प्रत्येक नवजात शिशूची माहिती गोळा करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचित करण्यात आले आहे. आवश्यक असणाऱ्या प्रसिद्धी साहित्य व अहवालाचे नियोजन करण्यात आले असून बांधकाम ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची माहिती देण्याचे कामगार विभागाला सूचित करण्यात आले आहे. या शिवाय अंगणवाडी सेविका, आशाताई यांची बैठक घेतल्या जाणार आहे. गेल्या वर्षी ज्या भागांमध्ये कमी नोंदी झाल्या होत्या अशा रामटेक व अन्य तालुक्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
जिल्ह्यात ३.२० लक्ष लसी येणार
या मोहिमेकरिता नागपूर जिल्ह्यासाठी तीन लक्ष २० हजार पोलिओ लसीची मागणी करण्यात आलेली असून १७ जानेवारीच्या पूर्वी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ही लस पुरवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य व ग्रामीण पातळीवरील यंत्रणेतील ६ हजार ९७ कर्मचारी कार्यरत असणार आहेत.