नागपूर Protest For Separate Vidarbha : विदर्भावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी गुरुवारी नागपूर कराराची होळी केली. संतप्त झालेल्या विदर्भवाद्यांनी शहरातील व्हेरायटी चौकात नागपूर कराराची होळी करत जोरदार आंदोलन ( Nagpur Protest ) केलं. 28 सप्टेंबर 1953 रोजी 'नागपूर करार' पारित झाला होता. त्यानुसार सिपी अँड बेरारची राजधानी म्हणून ओळख असलेल्या नागपूरसह अनेक शहरं महाराष्ट्रात सहभागी झाले होते. तेव्हा पासूनचं विदर्भावर अन्याय सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा विदर्भवाद्यांनी केला आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात झाला होता करार :तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात नागपूर करार झाला होता. तेव्हापासून राज्यकर्त्यांनी विदर्भावर अन्यायाची भूमिका घेतलेली असल्याचा आरोप विदर्भवाद्यांकडून करण्यात आला. नागपूर करार असंवैधानिक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार करण्यात आला होता, तेव्हा विदर्भाला सर्व सुविधा देण्यात येतील, असं या करारात नमूद करण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचा आरोप विदर्भवादी करत आहेत. त्यामुळे नागपूर करार हा असंवैधानिक असल्याच्या मुद्यावरुन विदर्भ राज्य आंदोलन समितीनं नागपुरात कराराची होळी केली आहे.