नागपूर -खाजगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांचे उपचार करताना अव्वाचा सव्वा दर आकारण्यात येत आहे. अशा तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नागपूर मनपाकडून तज्ज्ञ लोकांची एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला तक्रारींनंतर तीन दिवसांच्या आत बिलांची तपासणी करुन अभिप्राय सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समिती गठीत करण्यासंबंधी आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले आहे.
प्रतिनिधी - दयाशंकर तिवारी, महापौर, नागपूर तक्रारीचे तातडीने निराकरण करण्यासाठी समिती -
शहरातील लोकप्रतिनिधी, रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक यांचेकडून सातत्याने रुग्णालयांविरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी खाजगी रुग्णालयात कोव्हिड रुग्णाचा उपचारादरम्यान होत असलेल्या अधिकच्या देयक आकारणी संदर्भातील तक्रारीचे तातडीने निराकरण करुन अनुषंगीक कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत केली आहे. समिती आपला अहवाल अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे सादर करेल.
काही जण देत आहे सेवा तर काही संधी साधू -
या संकटकाळात वैद्यकीय चमू अहोरात्र सेवा देत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण काहीजण संधी म्हणून उपयोग घेत आहेत. कोरोना उपचारात खासगी रुग्णालयामध्ये आपल्यासोबत अन्याय झालेला आहे, अशी भावना असलेल्या सर्व नागरिकांनी या समितीकडे आपली तक्रार करावी. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, ऑडिट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मनपातील अधिकारी सुद्धा असल्याने निराकरण करतील. यासोबतच नागरिकांच्या सुविधेसाठी गठीत समितीने योग्यरित्या कार्य करावे, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना केली आहे.
या समितीत हे असणार तज्ज्ञ मंडळी -
समितीमध्ये डॉ. निसवाडे (सेवानिवृत्त अधिष्ठाता) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, डॉ. मिलिंद भुरसुंडी, सेवानिवृत्त विषाणूशास्त्रज्ञ, डॉ. शेलगावकर, Anesthetist, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, डॉ. हर्षा मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, म.न.पा.नागपूर, संजय वेनोरकर, सहायक लेखाधिकारी, महालेखाकार, लेखापरीक्षा कार्यालय, नागपूर, संजय मटलानी, सहायक लेखाधिकारी, उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कार्या. नागपूर, प्रशांत गावंडे, सहायक लेखाधिकारी, सहसंचालक लेखा व कोषागार, नागपूर, निर्भय जैन, उपायुक्त (सा.प्र.वि.) महानगरपालिका, नागपूर, महेश धामेचा, सहा.आयुक्त (साप्रवि) म.न.पा.नागपूर यांचा समावेश आहे.
हेही वाचा - फक्त १५ मिनिटांत उरकले सोनाली कुलकर्णीचे लग्न!