वज्रमुठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात नागपूर :महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्लात होणार आहे, त्यामुळे या सभेला अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरतील अशी शक्यता आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे अजित पवार वज्रमुठ सभेत आपली भूमिका स्पष्ट करतील का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजप आणि शिवसेना नेत्यांचा समाचार घेतील अशी शक्यता आहे.
एक लाख लोकं येण्याचा अंदाज : दर्शन कॉलनीच्या ज्या मैदानात सभा होणार आहे, त्याठिकाणी ४० हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय परिसरात अनेक स्क्रिन लावण्यात येणार आहे. सभेत १ लाख लोकं येतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वक्त केली आहे.
नागपूरची सभा भव्य होईल :नागपूरची एक संस्कृती आहे, सर्वव्यापी समाज आहे. विरोधी पक्षाची सभा होऊ नये म्हणून भाजपने सभेला जोरदार विरोध केला आहे. सत्ताधारी नेते कोर्टात जात आहे. सर्व अडथळे दूर झाले असून उद्या होणारी वज्रमुठ सभा भव्य आणि यशस्वी होईल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
तर भाजप 150 पुढे जाणार नाही :राहुल गांधी देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना भेटत आहे. शरद पवार, नीतीश कुमार, तेजस्वी यादव यांना भेटले. ममता बॅनर्जी यांना ते भेटणार असण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आणि खर्गे यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. 2024 पर्यंत संपूर्ण विरोधी पक्ष एका झेंडयाखाली एकत्र आले पाहिजे. एकास एक उमेदवार दिला तर भाजप 150 आकडा पार करणार नाही.
सभेला न्यायालयाची परवानगी : १६ एप्रिल रोजी नागपुरात होणाऱ्या वज्रमुठ सभेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे अखेर वज्रमुठ सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. अटीशर्तीनुसार असा सभा झाली की नाही यावर २४ एप्रिलला सुनावणी होणार आहे. पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या मैदानावर वज्रमुठ महासभाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सभेची जागा खेळाचे मैदान असल्याने भारतीय जनता पक्षासह स्थानीक नागरिकांनी सभा स्थळाला विरोध केला होता. त्यापैकी काहींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
हेही वाचा - Shivani Wadettiwar Statement : शिवानी वडेट्टीवार यांच्या सावरकरांवरील वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका; म्हणाले...