नागपूर - येथील प्रवासी नसलेल्या मेट्रोत चक्क प्री-वेडिंग फोटोशूट करण्यात आल्याचे फेसबुक व्हिडिओमधून समोर आले आहे. सदर जोडप्याने आणि फोटोग्राफरने मेट्रो ट्रेनमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आटोपून टाकला आहे. तर, प्री-वेडिंगसाठी सुंदर आणि आकर्षक डेस्टिनेशनकरता हजारो रुपये मोजणाऱ्या फोटो कलाकारांनी चक्क फुकटात प्रवासी नसलेल्या मेट्रोत फोटोशूट उरकून टाकल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
प्री-वेडिंग शूट ते सुद्धा चक्क मेट्रोमध्ये करण्याची भन्नाट कल्पना या जोडप्याला आणि त्यांच्या फोटोग्राफरला सुचली. नागपुरातील एका प्रवासी नसलेल्या मेट्रोत हे प्री-वेडिंग फोटेशूट करण्यात आले. त्यानंतर लगेचच ते फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्यामुळे प्री-वेडिंग शूट करिता नवा पर्याय उपलब्ध झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. तर, प्रवाशांनी पाठ फिरवलेल्या नागपूर मेट्रोचा आणखी एक चांगला उपयोग होऊ शकतो हे नागपूरातील कलाकारांनी शोधून काढले आहे. सार्वजनिक ठिकाणी फोटो काढण्यात काही गैर नाही. आता मेट्रोचा असाही वापर करता येईल, हे या निमित्ताने समोर आले आहे. मात्र, धोकादायकरीत्या फोटो न काढणे तसेच, स्वतःच्या आणि लोकांच्या जिवाशी खेळ न करण्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.