नागपूर - डिसेंबरमध्ये चांगले लोक जन्माला येतात, कारण डिसेंबरमध्ये मी, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी, प्रतिभाताई पवार यांचा वाढदिवस असतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व नेते आणि काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.
सार्वजनिक जीवनात कसे काम करावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला. आक्रमक नसतानाही त्या विरोधी पक्षनेत्या होत्या असेही पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रपती असताना प्रतिभाताईंनी प्रत्येक राज्यातल्या शेती मंत्र्यांची बैठक बोलावली होती. प्रत्येक राज्यात काय परिस्थीती चालली आहे याची माहीती घेतल्याचे पवार म्हणाले. त्या राष्ट्रपती असताना सुखोई विमानात बसल्या होत्या. ही खूप मोठी गौरवाची बाब असल्याचे पवार म्हणाले.
१०० वा वाढदिवस करण्याची संधी मिळो - उद्धव ठाकरे
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आमचे माझ्या आजोबांपासून संबंध असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. त्यांचा १०० वा वाढदिवसही साजरा करण्याची संधी मिळावी असेही ते म्हणाले. प्रतिभाताईंना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला तेव्हा अनेकांना धरणीकंप झाल्यासारखे वाटले. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे प्रतिभाताईंना पाठिंबा दिला. त्यावेळी दडपण आणले होते मात्र, स्विकारले नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रपती हा जनतेने दिलेला मोठा सन्मान - प्रतिभाताई पाटील
देशाचे राष्ट्रपती होणे हा माझ्यासाठी जनतेने दिलेला मोठा सन्मान असल्याचे वक्तव्य प्रतिभाताई पाटील यांनी केले. सर्वांनी वेळात वेळ खाडून सत्कार केल्याबद्दल प्रतिभाताईंनी सर्वांचे आभार मानले. मी राष्ट्रपती असताना जबाबदारी पार पाडताना मेहनत घेतल्याचे त्या म्हणाल्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी असल्याचे प्रतिभाताई म्हणाल्या.
मी ५० वर्ष सक्रीय राजकारणात भाग घेतला. राज्याने मला सहकार्य केले, त्याबद्दल जनतेचे आभारही यावेळी त्यांनी मानले. राजकारणात येण्यासाठी वडिलांची प्रेरणा आणि संस्कार होते. लग्नानंतर राजकारणात पतीनेही साथ दिली. प्रत्येक वेळी नवीन शिकायला मिळाल्याचे प्रतिभाताई म्हणाल्या.