मुंबई :मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा समाजातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पुढील महिन्यात मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडं ओबीसीतून मराठा समाजाला दिले जात असलेले कुणबी दाखले रद्द, करा अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. अन्यथा ओबीसी समाजाच्या वतीनं 20 जानेवारीपासून राज्यभर आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेतलं जाईल :मराठा आरक्षणामुळं मराठा समाजानं मोठं आंदोलन उभं केलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी दाखले देण्यात येत आहेत. मराठा समाजाच्या लाखांच्या सभा होताय. त्यामुळं राज्य सरकारवर दबाव निर्माण होत आहे. मात्र, कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यईल, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे. मात्र, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास दोन कोटी लोकांना त्याचा फायदा होईल, असा दावा मराठा नेते उघडपणे करत आहेत. दोन ते अडीच कोटी मराठा समाज ओबीसी समाजात सामील झाल्यास, ओबीसींचं आरक्षण राहणार नाही, असं संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला वाटत असल्याची प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिली.
20 जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन :मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईत आरक्षणासाठी उपोषणाला करणार आहेत. तसंच आंदोलन राज्यातील जिल्हा-जिल्ह्यात ओबीसी समाज देखील केल्याशिवाय गप्प बसणार नाही. लोकशाही मार्गानं प्रत्येक जिल्ह्यात 20 लाखांच्या संख्येनं आंदोलन करणार असल्याचं शेंडगे यांनी म्हटलंय.