नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचंड रंगतदार होणार आहे. हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध दुभंगलेली महाविकास आघाडी अशी होणार आहे. भाजप समर्थीत नागो गाणार यांना कडवी झुंज देण्यासाठी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय अद्याप काँग्रेस पक्ष करू शकलेला नाही.
२७ पैकी ५ उमेदवारांची माघार :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी एकूण 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. बंडखोरी, नाराजी नाट्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. मात्र, नागपूरात राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने माघार घेतलेली नाही. काँग्रेसकडून सुधाकर आडबाले यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राजेंद्र झाडे यांना अत्यंत मजबूत प्रतिस्पर्धी मानले जात आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते.
मातोश्रीवरून कॉल येताच गंगाधर नाकाडेची माघार :महाविकास आघाडीत झालेल्या सुरुवातीच्या वाटाघाटीत नागपूरची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाला मिळाली होती. त्यानुसारनागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नाशिक विभागात काँग्रेसला नामुष्कीचा सामना करावा लागल्याने परत फेरबदल करत नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. मातोश्रीवरून कॉल आल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी गंगाधर नाकाडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. गंगाधर नाकाडे यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली होती. पण आता शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करू :गेल्या पाच वर्षांपासून गंगाधर नाकाडे शिक्षक सेनेचा विभागीय अध्यक्ष आहेत. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम आम्ही करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूरचे पदाधिकारी सतीश इटलीवर हे शिक्षक मतदार संघामध्ये उभे होते. त्यांच्या अर्ज वापस घेण्याची आज शेवटची तारीख होती. परंतु त्यांनी आपला अर्ज वापस घेतला नाही म्हणून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नागपूर, नाशिक मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत :राज्यात पाच ठिकाणी, कोकण, औरंगाबाद, नागपूर येथे शिक्षक आणि नाशिक, अमरावती येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. यांपैकी नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक हे दोनच मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. नाशिक सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आणि शिवसेनेचा पाठिंबा लाभलेल्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने, तर नागपूर गंगाधर नाकाडे यांची माघार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश इटकेलवार हे नॉट रिचेबल असल्यामुळे आता नागपुर रिंगणात २२ उमेदवार असणार आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक नागो गाणार सलग दोनदा निवडून आले होते. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाने देवेंद्र वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देवेंद्र वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने यावेळची निवडणूक तिरंगी होणार हे जवळजवळ आता स्पष्ट झालेलं आहे.
हेही वाचा: Amravati Graduate constituency election : ठरलं तर! एवढे उमेदवार लढणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक
पाच पैकी दोन जागा विदर्भातील :विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 2 जागा या विदर्भातील आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारीला जारी झाली आहे. 12 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार, 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार, तर 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.