नागपूर : उमरेड कऱ्हांडला जंगलाच्या जवळ असलेल्या एका खासगी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. या रिसॉर्टमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या सहा नृत्यांगनासह बारा बड्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टायगर पॅराडाईज रिसॉर्ट असे पोलिसांनी छापेमारी केलेल्या रिसॉर्टचे नाव असून हे रिसॉर्ट उमरेड कऱ्हांडला अभयारण्याला लागून आहे. व्याघ्र प्रकल्प जंगलालगत टायगर पॅराडाईज रिसॉर्टमध्ये हाय प्रोफाईल पार्टी सुरू असल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली.
डीजेच्या तालावर थिरकत होत्या नृत्यांगना : छापेमारीच्या कारवाईदरम्यान विद्युत रोषणाईच्या झगमगाटामध्ये, डीजेच्या तालावर नृत्यांगना थिरकत होत्या. येथे उपस्थिती बड्या हस्तींच्या जवळ दारूच्या बॉटल्स होत्या. नृत्यांगणांवर हवेत पैसे उडवून डान्स हंगामा सुरू होता. रिसॉर्टमधील एका बंद हॉलमध्ये हा धिंगाणा सुरू होता.
अनेक बड्या व्यक्ती ताब्यात : पोलिसांनी कारवाई करत सहा नृत्यांगनासह बारा पुरुष असे एकूण 18 जणांवर कारवाई केली. यात रिसॉर्टच्या मॅनेजरचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये नागपूर, भंडारा, मौदा, उमरेड येथील अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.