नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ग्रीसहून बंगळुरुत दाखल झाले. तेथे त्यांनी चंद्रयान ३ च्या टीममध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. नरेंद्र मोदींचे बंगळुरु विमानतळावर ढोल वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी विमानतळावरून इस्रो सेंटरपर्यंत त्यांचा रोड शो झाला. मात्र आता या रोड शोवरून वाद निर्माण झालाय.
पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांसोबत रोड शो करायला हवा होता : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या रोडशोवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'पंतप्रधानांचा रोड शो राजकीयदृष्ट्या प्रेरित होता', असे ते म्हणाले. 'पंतप्रधान शास्त्रज्ञांना भेटायला गेले. आम्हाला शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. देशाच्या पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना भेटायला हवं. पण त्यांनी रोड शो का केला? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला. 'ज्या शास्त्रज्ञांनी हे मिशन यशस्वी केलं त्यांच्यासोबत हा रोड शो केला असता तर ती अभिमानाची गोष्ट राहिली असती. या रोडशो मागे २०२४ लोकसभा निवडणुकीचं उद्दीष्ट होतं'. पंतप्रधानांचा हा रोड शो राजकीयदृष्ट्या प्रेरित होता, असे आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.
भाजपाच्या इतिहासात शिकविण्यासारखे काय आहे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता भारतीय जनता पक्षाचा इतिहास शिकवला जाणार आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप नोंदवला. 'भाजपाचा इतिहास जर विद्यापीठांमध्ये शिकवला जात असेल तर ते दुर्दैवी आहे', असे ते म्हणाले. 'भाजपाच्या इतिहासात शिकवण्यासारखे काय आहे? त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. त्यांनी देशासाठी काही योगदान दिलं नाही. उलट त्या काळात ते सत्ताधाऱ्यांना साथ देत होते', असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.
पवार पुरोगामी विचारांना धरून राहतील :यावेळी बोलताना वडेट्टीवारांनी शरद पवारांवर आपली भूमिका मांडली.'शरद पवार पुरोगामी विचारांना धरून राहतील. ते दौरे करत आहेत. त्यामागे यांची काही भूमिका असेल. त्यांच्या भूमिकेमुळे 'इंडिया' आघाडी आणि महाविकास आघाडीला फायदाच होईल, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विषय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आहे. जे मंत्री, आमदार आणि खासदार गेले, त्यांच्यावर कारवाई होईल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय, असे वडेट्टीवारांनी नमूद केलं.
हेही वाचा :
- Narendra Modi : गेल्या ९ वर्षांत आम्ही बांधलेल्या रस्त्यांचे अंतर पृथ्वी ते चंद्रातील अंतराएवढे - नरेंद्र मोदी
- Narendra Modi ISRO : चंद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरलं ती जागा 'या' नावानं ओळखली जाईल, पंतप्रधान मोदींची घोषणा
- Narendra Modi : नरेंद्र मोदींनी घेतली इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची भेट, चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन केलं