नागपूर - ६३ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भीम अनुयायांकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. नागपुरातील दीक्षाभूमीवर बुधवारी सकाळपासूनच अनुयायी अभिवादन करत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीत प्रवेश बंद असल्याने अनुयायांकडून प्रवेश व्दारावरूनच अभिवादन करण्यात येत आहे. शिवाय दरवर्षी दिक्षाभूमीवर भीम सागर एकवटतो. या वर्षी मात्र दीक्षाभूमीवर शुकशुकाट दिसून आला. सोबतच पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा पहायला मिळत आहे.
बाबासाहेबांनी ज्या दिवशी धम्म दिक्षा ग्रहण केली होती, तो दिवस विजयादशमीचा होता. त्यानुसार प्रत्येक दसऱ्याला दीक्षाभूमीवर लाखो भीम अनुयायी येतात. तिथी नुसार तो दिवस १४ ऑक्टोबरचा असल्याने नागपूरसह विदर्भ व इतरही राज्यातील बौद्ध अनुयायी दिक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतात. परंतू यंदा मात्र दीक्षाभूमीवर मोजकेच अनुयायी दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून अद्यापही कोणतीही धार्मिक प्रार्थना स्थळे उघडण्यास परवानगी दिली नाही. याच अनुशंगाने दीक्षाभूमीतील प्रवेशही या वर्षी बंद आहे. त्यामुळे दरवर्षी लाखोंने येणाऱ्या भीम अनुयायांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय दीक्षाभूमीत प्रत्यक्ष प्रवेश बंद असल्याने बाबासाहेबांच्या स्मृतीस प्रवेश व्दारावरूनच अभिवादन केल्या जात आहे.
ऐरवी आजच्याच दिवशी दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जातात. परंतु यावर्षी मात्र परिसरात कोणतेही कार्यक्रम किंवा उत्सवांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या अनुयायांना प्रवेश व्दारावरूनच माघारी जावे लागत आहे. अनेक अनुयांयाकडून तर प्रवेश व्दारालाचा माल्यार्पण करून अभिवादन करत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय एकीकडे मंदिरे सुरू करण्याच्या मागण्या होत आहेत तर शासनाने सर्वच धार्मिक स्थळे सुरू करायला हवे, अशी भावनाही दीक्षाभूमीवर येणाऱ्या भीम अनुयायांनी ई टीव्हीशी बोलतांना सांगितले.
यावर्षी दीक्षाभूमीवर येऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस प्रत्यक्ष अभिवादन करू शकत नाही. याची खंत वाटत आहे. कारण याच दीक्षाभूमीवरून आम्हांला नवचैतन्य मिळते. असेही भीम अनुयायांनी सांगितले. त्यामुळे शासनाकडून लवकर सर्वच प्रार्थना स्थळे सुरू करावे. अशा भावनाही जनसामान्यांमधे उमटत असल्याचे दिसून येत आहे, असे असले तरी दीक्षाभूमीवरिल तो चैतन्य यंदा मात्र कमी असल्याचे दिसून येत आहे.