नागपूर - ईव्हीएम एक मशीन आहे, त्यामुळे आम्हाला ईव्हीएम नाही तर जनता मत देते. म्हणून जनतेच्या विश्वासाला पात्र व्हा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या ईव्हीएम विरोधी भूमिकेवर जोरदार टीका केली. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच आम्ही जनतेशी संवाद करत आहोत तर तुम्ही ईव्हीएमरुपी मशीनीसोबत संवाद करत आहात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील तमाम जनतेचा जनादेश घेणे हे या यात्रेचे ध्येय आहे. निवडणुकांमध्ये यश-अपयश येत असते. मात्र, अपयश आल्यानंतरही जनतेशी नाळ टिकून राहणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात केलेल्या कामाविषयी ते म्हणाले की, राज्य सरकारने दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली आहे. विशेष म्हणजे २००९ साली आघाडी सरकारच्या काळात ज्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नव्हती त्या शेतकऱ्यांनाही आम्ही वीज जोडणी दिली. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले. मात्र, याचवेळी विदर्भाचा विकास करताना कोणत्याही भागावर अन्याय होऊ दिला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.