नागपूर -येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या मेडिसीन विभागामध्ये, तर कधी निवासी कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर म्हणून वावरणाऱ्या एका तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ जैन असे या डॉक्टरचे नाव असून, तो मूळचा अहमदाबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती पुढे आली आहे.
बनावट डॉक्टर बनून लोकांची फसवणूक, पोलिसांनी केली अटक 'डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले होते'
मागील काही दिवसांपासून त्याच्या हालचालींवर अनेक डॉक्टरांना संशय आला होता. मात्र, तो कुणाच्या हाती लागत नव्हता. कालही हा डॉक्टर मेडिकलच्या मेडिसीन विभागाचा निवासी डॉक्टर असल्याचे सांगत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी आला होता. या संदर्भात माहिती समजताच आगोदरच तयारीत असलेल्या मेडिकल ऑफिसरने याला पकडले. त्यानंतर घटना पोलिसांना कळवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने बीएसस्सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याची माहिती समोर आली. त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले होते, पण काही कारणास्तव डॉक्टर होता आले नाही. त्यामुळे ॲप्रन घालून आपली हौस भागवण्यासाठी मेडिकलमध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याने अनेकांना उपचाराच्या नावावर गंडा घातल्याचेही समोर आले आहे.
'असा झाला खुलासा'
सिद्धार्थ जैन या नावाची प्लेट ॲप्रनवर लावून कॅज्युअल्टीच्या बाहेर उभा राहायचा. गळ्यात स्टेथेस्कोप अडकवून तो गरीब व गरजू रुग्णांसोबत संपर्क साधायचा. रुग्णांना चांगल्या उपचाराची हमी देत त्यांच्याकडून पाच ते दहा हजार रुपये घेत होता. ॲप्रन घातलेल्या डॉक्टरला पाहून, रुग्ण विश्वास ठेवून पैसेही देत होते. तो त्या रुग्णासोबत कॅज्युअल्टीमध्ये किंवा वॉर्डात जाऊन तेथील निवासी डॉक्टरांना संबंधित रुग्णाकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना करीत होता. मात्र, नंतर तो गायब होत असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता,
त्या पार्श्वभूमीवर त्याचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.