नागपूर - जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. सद्दाम हसुनुद्दीन खान (वय - २६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपींनी सद्दामचा खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने ही घटना समोर आली. ज्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे कमलेश शुक्ला या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी पळून गेल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. धक्कादायक माहिती म्हणजे मृत सद्दाम खान आणि आरोपी कमलेश यांनी मिळून पार्टनरशिपमध्ये ठेकेदारी सुरू केली होती. पैशाच्या वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झाले होते, ज्यातून कमलेश शुक्ला आणि त्याच्या दोन नातेवाईकांनी मिळून सद्दामचा खून केल्याचा खुलासा झाला आहे.
पैशांच्या वादातून पार्टनरचा खून, एका आरोपीला अटक - नागपुरात पैशाच्या वादातून हत्या
नागपूरमध्ये पैशांच्या वादातून एकाने त्याच्या साथीदाराचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी कमलेश आणि सद्दाम यांनी सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे काम पार्टनरशिपमध्ये सुरू केले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. दरम्यान सात एप्रिलला सद्दाम अचानक बेपत्ता झाला. या संदर्भात खापरखेडा पोलीस ठाण्यात सद्दाम बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. सद्दामच्या कुटुंबीयांनी सद्दाम बेपत्ता होण्यामागे कमलेश शुक्ला जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी कमलेशची चौकशी केली होती.
सोमवारी दुपारी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव(रंगारी) येथील शेत शिवारातील एका विहिरीतून दोन दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याची सूचना मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील कचरा काढल्यानंतर त्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून येताच खळबळ उडाली. पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढला असता तो मृतदेह सद्दाम खानचा असल्याची ओळख पटली. पोलिसांनी लगेच कमलेश शुक्ला याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा भीमलेश शुक्ला आणि अंशु शुक्लाच्या मदतीने सद्दामचा खून केल्याचा खुलासा झाला आहे.