नागपूर -मनपानेकोरोना नियमांची पायमल्ली करीत लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या परिवारावर ५० हजार रुपयांची दंडात्मक केली होती. आता त्या लग्नात सहभागी सर्व वऱ्हाड्यांची कोरोना आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी मनपा करणार आहे. मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार यासंदर्भात सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने यांनी लग्न समारंभ आयोजक राजेश समुंद्रे यांना नोटीस दिले आहे.
सोमवारी १० मे रोजी लग्न समारंभात उपस्थित सर्व वऱ्हाडी, शेजारी, पाहुणे या सर्वांची मनपाच्या मोबाईल चाचणी केंद्रावरून कोरोना चाचणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. स्वीपर कॉलनी, सतरंजीपुरा झोन कार्यालयासमोरील रहिवासी राजेश समुंद्रे यांनी ५ मे २०२१ रोजी लग्न समारंभ आयोजित केला होता. परवानगी नसतानाही लग्न समारंभामध्ये १५० ते २०० लोक उपस्थित होते. याबाबत तातडीने दखल घेत मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करीत राजेश समुंद्रे यांचेकडून ५० हजार रुपये दंड वसूल केला होता.