नागपूर- कोरोनाच्या संकटात भारतीय जनता पक्षाकडून शनिवारी (दि. 26 जून) नागपूरसह संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने गर्दी झाल्यामुळे त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना उत्तर दिला आहे. ते म्हणाले, आम्हाला गर्दी करण्याचा कोणताही शौक नाही. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला धोका पत्करून रस्त्यावर उतरावे लागले. यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्य सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली
राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे आज ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द ठरवले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे पन्नास वर्षाचे आरक्षण शंभर टक्के जाणार असेल तर याविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकीकडे राज्य सरकारचे मंत्री ओबीसी समाजाला आरक्षण दिल्या शिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असे म्हणतात. दुसरीकडे पोटनिवडणुका जाहीर करून ओबीसी समाजाची फसवणूक सुरू केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. आम्ही समाजाचे सजग पहरी असल्याने धोका पत्करून आम्हाला जे-जे करावे लागेल ते सर्व आम्ही करू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.