अमरावतीPili village Story : उंच पहाडावर दिसणाऱ्या मंदिरात देवाची मूर्ती नाही, भल्या मोठ्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही. दोन वर्षांपूर्वी गजबजलेल्या 500 कुटुंबाच्या गावात सहा सदस्य असणाऱ्या एका कुटुंबा व्यतिरिक्त इतर कोणाचेही येथे घर नाही. घनदाट जंगल असणाऱ्या परिसरात दिवसभर किड्यांचा किरकिर आवाज आणि अधून मधून दोन लहान मुलांचा हसण्याचा, खेळण्याचा आणि कधी रडण्याचा आवाज बाकी सर्व शांतता असं चित्र केवळ एकच कुटुंब राहत असणाऱ्या मेळघाटातील पिली या गावात (Pili Village In Melghat) पाहायला मिळते. 'ईटीव्ही भारत' ने या गावात प्रत्यक्ष भेट दिल्यावर या गावात राहणाऱ्या भोगीलाल बैठेकर कुटुंबाच्या नेमक्या भावना जाणून घेतल्या.
दोन वर्षांपूर्वी झाले गावाचे पुनर्वसन: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मेळघाटात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने, घनदाट जंगलात वसलेल्या एकूण 37 गावांचे पुनर्वसन (Rehabilitate The Village) करण्याचा निर्णय दोन दशकांपूर्वी शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार आतापर्यंत 37 पैकी 17 गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच सहा गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत. पिली या गावचे देखील घनदाट जंगलातून 2021 मध्ये पुनर्वसन करण्यात आले. या गावातील 500 कुटुंब गावातून निघून गेले. ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्यावर कुठलाही दबाव किंवा जोर जबरदस्ती करता येणार नाही, अशी तरतूद कायद्यात असल्यामुळं गावातील प्रत्येकाला जबरदस्तीने बाहेर काढता येत नाही. यामुळंच पिली गावात भोगीलाल बैठेकर यांचे एकमेव कुटुंब अद्यापही तिथे राहत आहे.
दहा लाखात काय करायचं, आमचंच गाव मस्त : पुनर्वसनाच्या नावाखाली गावातील लोकांना दहा लाख रुपये मिळाले. आज माझ्याजवळ येथे माझ्या नावाचे 25 एकर शेत आहे. माझं मोठं घर आहे, आठ गाई आहेत आणि 15-20 कोंबड्या देखील आहेत. मी सुखी समाधानाने शेती करतो. माझ्या मोठ्या मुलाचे लग्न झाले तो सुद्धा पत्नीसह इथेच राहतो. दोन मुलांचे शिक्षण सुरू आहे. त्यांना मी दुचाकीने लगतच्या गावात असणाऱ्या शाळेत पोचवतो. माझी शेती मी करतो. पुनर्वचनासाठी मला माझ्या शेतीचा दरा एवढी किंमत आणि इतकेच मोठे घर, जागा देण्याची तयारी सरकारची असेल तर मला सुद्धा इथून निघून जाण्यास हरकत नाही. सरकार मात्र केवळ दहा लाख रुपये देत आहे. दहा लाखात काय होणार? त्या दहा लाखाचं काय करायचं, त्यापेक्षा आम्ही आमच्या गावातच मस्त जगत आहोत असं भोगीलाल बैठेकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.