नागपूर :Online Game Fraud Case :ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकवल्यानंतर नागपूरच्या व्यापाऱ्याला तब्बल 58 कोटींचा गंडा घालणारा आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन हा दुबईला पळून गेला होता. मात्र, आता तो तिथून देखील अन्यत्र पळून जाण्याच्या तयारीत असल्याची शंका निर्माण झाली आहे. 19 जुलैला केवळ एका महिन्याच्या पर्यटक व्हिसावर दुबईला पळून गेलेल्या सोंटू जैननं त्याचा व्हिसा 14 ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीला फरार घोषित करण्याची तयारी केली. सोंटू जैनच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पुढं आली आहे.
पोलिसांनी काढली लूकआउट नोटीस :आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन हा पर्यटक व्हिसा संपल्यानंतर भारतात परतणार होता. मात्र भारतात परतल्यावर त्याला अटक करण्याची तयारी नागपूर पोलिसांनी केली होती. नागपूर पोलिसांनी त्यासाठी लूकआउट नोटीस ( Look Out Notice ) सुद्धा काढली होती. मात्र, आरोपी सोंटू जैन नागपूर पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढं असल्याचं दिसून येत आहे. आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन विरुद्ध नागपूरच्या पोलिसांनी फास आवळायला सुरवात केल्याची माहिती समजताचं तो दुबईला पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या गोंदिया येथील घरातून तब्बल 12 किलो सोनं, 294 किलो चांदी आणि सुमारे 17 कोटींची रोख जप्त केली होती.