नागपूर -केवळ तंबाखूच्या बदल्यात दारूची अर्धी बाटली दिली नाही म्हणून एका अनोळखी तरुणाची हत्या करण्यात आली. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा मार्गावरील कापसी पुलाजवळ ही घटना घडली. २८ मे रोजी घडलेल्या या घटनेतील मृताची ओळख आद्यपही पटलेली नाही. मात्र, पारडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
नागपूरमध्ये तंबाखूच्या बदल्यात दारू न दिल्याने एकाची हत्या - nagpur latest news
केवळ तंबाखूच्या बदल्यात दारूची अर्धी बाटली दिली नाही, यासाठी एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा मार्गावरील कापसी पुलाजवळ हा प्रकार घडला.
मृताची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी आपले खबरी त्या भागात कार्यरत केले होते. तेव्हा अमित उर्फ जल्या सहदेव काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्मा हे दोघे त्या ठिकाणी जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्यांची कबुली देताना मृताची ओळख नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता मृत कोण आहे हे शोधून काढण्यासाठी पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत हा कापसी पुलाजवळील परिसरात एक निर्जनस्थळी एकटा दारू पित बसला होता. त्याचवेळी अमित उर्फ जल्या सहदेव काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्मा हे दोघे त्या ठिकाणी गेले. मृताने त्या दोघांकडे तंबाखू मागितला तेव्हा आरोपींनी तंबाखूच्या बदल्यात दारूची अर्धी बाटली देण्याची अट ठेवली. तेव्हा मृताने सुद्धा ती अट मान्य केली. मात्र, तंबाखू मिळताच मृताने दारू देण्यास नकार दिल्याने उद्भवलेल्या वादातून दोघांनी त्याच्या डोक्यात वीट घालून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.