नागपूर -गुरुवारी दिवसभरात नागपूर शहरात ११२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच नागपूरमध्ये १२ तासांत शंभरपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ११२पैकी १०० रुग्ण हे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि काही कैदी आहेत. इतर १२ रुग्ण शहरातील विविध भागांमधील आहेत.
गुरुवारपासून नागपुरात रॅपिड टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. ११२ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजारांची संख्या पार करून २०३२ इतकी झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाइन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर, अन्य १४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४१२ इतकी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३० आहे. सध्या ५९० ॲक्टिव्ह रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल,कामठी येथे उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६९ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर १.४७ इतका झाला आहे.