नागपूर- मुलासोबतच्या भांडणाचे सूड घेण्यासाठी त्याच्या वृद्ध आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील डोंगरमौदा येथील एका शेतात लिलाबाई वासनिक यांची हत्या करून मृतदेहाचे 5 तुकडे करून ते शेतात जाळल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येच्या घटनेचा उलगडा केला आहे. कुही पोलिसांनी लिलाबाईच्या हत्येप्रकरणी एका गुराख्याला अटक केली आहे.
हेही वाचा -सत्ता परिवर्तनानंतर विकास होईल की अन्याय; विदर्भाच्या जनतेत संभ्रम
नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील डोंगरमौदा गावात शेतात जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे. दोन दिवसांपूर्वी 65 वर्षांच्या लिलाबाई वासनिक नावाच्या महिलेच्या मृतदेहाचे काही तुकडे त्यांच्याच शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळाले होते. लिलाबाई या वृद्ध महिलेचे जळालेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.
लिलाबाई वासनिक गेल्या आठवड्यातच धानाच्या मळणीसाठी डोंगरमौदा या गावात त्यांच्या मुलासोबत आल्या होत्या. त्या दिवशी मुलगा राहुलचा गावातील राजेश सोनटक्के नावाच्या गुराख्यासोबत शेतात गुरे चारण्यावरून वाद झाला होता. तेव्हा पोलीस तक्रार देण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी मुलगा राहुल डोंगर मौदावरून नागपुरला परतला होता. मात्र, लिलाबाई डोंगरमौदालाच राहिल्या होत्या. 2, 3 दिवस वृद्ध लिलाबाईसोबत फोनवर संपर्क न झाल्यामुळे वासनिक कुटुंबीयांनी त्यांच्या शोधात पुन्हा डोंगरमौदा गाव गाठले होते.
हेही वाचा -नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?
तेव्हा शेतातील गवताच्या ढिगात जळालेल्या अवस्थेतील गवत आणि हाडे दिसली होती. तर, काही अंतरावर केस व डोक्याची कवटीही दिसली होती. लिलाबाईच्या नातेवाईकांना त्यांच्या बांगड्या व चप्पलही तिथे आढळली होती. तेव्हाच त्यांच्या हत्येचा शोध पोलिसांनी सुरू केला होता.
राजेश सोनटक्केने मुलासोबतच्या वादात वृद्ध आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक म्हणजे, राजेशने लिलाबाईची हत्या डोक्यावर काठी मारून केली, त्यानंतर मृतदेह गवतात जाळला. दुसऱ्या दिवसापर्यंत अर्धाच मृतदेह जळाल्यामुळे राजेशने मोठ्या कोयत्याने मृतदेहाचे अनेक तुकडे करत ते शेतात वेगवेगळ्या ठिकाणी जाळले होते. दरम्यान, पोलिसांनी राजेश सोनटक्केला अटक केली आहे.