नागपूर- जागतिक योग दिन सर्वत्र साजरा केला गेला. मात्र, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनि तालुक्यातील शेतकऱयांनी अर्धनग्न होऊन विजेच्या टॉवरखाली हास्य योगा करत अनोखे आंदोलन केले आहे.
नागपूर: अर्ध नग्न होऊन शेतकऱ्यांनी केले हास्य योगा आंदोलन - जागतिक योग दिन
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनि तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणचा निषेध करण्यासाठी अर्धनग्न होऊन विजेच्या टॉवरखाली हास्य योगा करत अनोखे आंदोलन केले आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून विजेचे हाय व्होल्टेज टॉवर गेले आहेत. मात्र, त्याच शेतकऱयांना वीज जोडणी न देता सोलर वीज वापरण्याचा सल्ला महावितरण देत आहे. विजेचे टॉवर लावण्या करिता शेतशिवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली. त्याची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळाली नाही.
दुष्काळामुळे पीक होत नसताना टॉवरमुळे जमिनीचे उत्पादन देखील घटले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱयांवर शासन संकटांची भडिमार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योगा दिनी अनोखे आंदोलन करून महावितरणचा निषेध नोंदविला. खाजगी टॉवर कंपनी ज्या प्रकारे जमिनीच्या मोबदल्यात महिन्याकाठी पैसे देते त्याच प्रकारे महावितरणने देखील शेतकऱ्यांना पैसे द्यावे, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली.