नागपूर- महामेट्रो लाईनच्या उद्घाटनादरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी भाषण करताना मंचावर बसलेल्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील जोरदार टीका केली.
नागपुरात नितीन विरुद्ध नितीन, रंगला शाब्दिक सामना
आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे नागपूर-विदर्भाचे प्रतिनिधित्व करत होते. पण आता काँग्रेसचे नितीन राऊत, सुनील केदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे सरकारमध्ये नागपूर-विदर्भाचे प्रतिनिधी आहेत. नागपूरचे-विदर्भाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आम्ही कुठलेही राजकारण न करता, त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असे गडकरी यांनी सांगितले.
राऊत यांनी महामेट्रो माझ्याच आग्रहामुळे झाल्याचे झाल्याचे सांगितले. तर फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी गेल्या 5 वर्षात किती रोजगार मिळवून दिले? असा सवालही केला. तर यावर श्रेयावादाच्या यादीत माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचेही नाव समाविष्ट करून टाका. कारण, त्यांचाही दावा आहे की, मेट्रो त्यांच्यामुळेच नागपुरात आली आहे, असा टोला गडकरी यांनी लगावला.
रोजगाराच्या प्रश्नावरही गडकरी यांनी 23 हजार तरुणांना रोजगार मिळाल्याचा दावा केला. त्यामुळे या 2 नेत्यांच्या जुगलबंदीमुळे या कार्यक्रमाला राजकीय रंग चढल्याचे बघायला मिळाले.