नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शुक्रवार) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील कोरोना परिस्थिती माहिती दिली होती. कोरोनाला पराभूत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे मत नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -'अर्जेरिया शरदचंद्रजी'! जगात प्रथमच सापडलेल्या वनस्पतीला दिले शरद पवारांचे नाव
विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन
राज्याच्या तुलनेत नागपूरची परिस्थिती गंभीर आहे. राज्यात अनेक ठिकाणी रक्तासाठा आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तर नागपूरमध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेडस उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. या निर्माण झालेल्या संकटावर उपाय शोधण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. केवळ नागपूरात नाही तर संपूर्ण राज्यात देखील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे राऊत यांनी सांगितले. प्रशासनाकडून अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र, लोकांच्या सहकार्याशिवाय प्रशासन काहीही करू शकणार नसल्याचे राऊत म्हणाले.
नागपूरात ऑक्सीजनचा तुटवडा नाही
शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नागपूरमध्ये ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा -नजरचूक! हा तर 'धक्कादायक विनोद' म्हणावा लागेल