नागपूर :नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा खटला मुंबईत स्थलांतरित करण्यासाठी एनआयएने मागील महिन्यातच नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी नितीन गडकरी खंडणी प्रकरण मुंबईला स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी विशेष सत्र न्यायालयाने एनआयएची मागणी नामंजूर केली. न्यायालयाने एनआयएला उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे एनआयएकडून हा खटला मुंबईत स्थलांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नागपूर कनेक्शन :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात 14 जानेवारी आणि 21 मार्चला बेळगावच्या तुरुंगातून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागण्यासाठी फोन आले होते. सुरुवातीला या प्रकरणात जयेश कांथा नामक कुख्यात गुंडाचा सहभाग आढळला होता, तो बेळगाव कारागृहात कैद होता. जयेश कांथाला २०१६ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर तपासात अफसर पाशा नामक दहशतवाद्याचे नाव पुढे आले. नागपूर पोलिसांनी अफसर पाशाला बेळगाव तुरुंगातून नागपूरला आणले. जयेश कांथा आणि अफसर पाशाची समोरासमोर बसवून चौकशी केली. त्यात आरोपीचे नागपूर कनेक्शन पुढे आले होते. सध्या दोन्ही आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत.
अफसर पाशाचे दहशतवादी कनेक्शन :केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शंभर कोटींची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणातील मास्टरमाईंड दहशतवादी बशीरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाला 15 जुलै रोजी बेळगाव येथील तुरुंगातून अटक केली होती. अटक केल्यानंतर पहिल्यांदा 4 दिवस, नंतर ३ दिवस, त्यानंतर आणखी 3 दिवस असे एकूण 10 दिवस पोलीस कोठडीत त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याचे नागपूर कनेक्शन, दहशतवादी संघटनाशी असलेले संबंध उघड झाले होते.