नागपूर-दहावीची ही परीक्षा जीवनातील शेवटची परीक्षा नाही, ही सुरुवात आहे. जीवन हीच एक मोठी परीक्षा आहे. करियरच्या वाटेत अनेक परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर आपली क्षमता सिद्ध करा. आपल्या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याचे शिक्षण हेच सर्वात मोठे माध्यम आहे, असा मंत्र केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला, ते महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या सत्काराच्या वेळी बोलत होते.
सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलेच महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. परंतु,ही सर्वच मुले शिक्षणात मागे पडतात हा सर्वसामान्यांचा समज नागपूर महानगरपालिकेने खोडून काढला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता आहे, त्यांना फक्त प्रोत्साहन आणि योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ही गरज ओळखून नागपूर महानगरपालिकेचे शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग पॅटर्न राबविले त्याचे फलित या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून दर्शविले आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.