नागपूर - लॉकडाऊनमध्ये अडकल्याने अनेक गरीब व गरजूंना रोजचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अशाच नागपुरातील 'मैत्री परिवार' या सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कम्युनिटी किचनला भेट
नागपूरच्या मैत्री परिवार या संस्थेने गरजुंच्या मदतीसाठी सुरू केलेल्या कम्युनिटी किचनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक भेट देऊन प्रत्यक्ष सुरू असलेल्या कार्याची पाहणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. या कठीण काळी अनेक सामाजिक संस्था या गरजुंना मदत करण्याकरता समोर आल्या. नागपुरातील मैत्री परिवार या सामाजिक संस्थेतर्फे गरजुंसाठी कम्युनिटी किचनची सुरुवात करण्यात आली. नागपुरात या संस्थेतर्फे ३ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू असून दररोज या माध्यमातून सुमारे ५ हजार गरजूंना भोजन पुरवण्यात येत आहे. ज्यामध्ये शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व काही वस्त्यांचा समावेश आहे.
स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या उपक्रमात सहभागी आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी गडकरी यांनी सपत्नीक 'मैत्री परिवार'च्या कम्युनिटी किचनमध्ये जाऊन प्रत्यक्ष सुरू असलेल्या कार्याची पाहणी केली. तसेच, मैत्री परिवाराला त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.