नागपूर- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांनी बहुमताने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रातही भाजप-सेनेला चांगली आघाडी मिळाली, हे सर्व आमच्यामुळे नाही, तर कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळे शक्य झाले आहे, असे भावोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
कार्याक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आणि मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी शनिवारी पहिल्यांदाच नागपुरात आले होते. या निमित्त खासदार महोत्सव समिती आणि शहर भाजपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.
दळणवळणासोबतच लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये विकास करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करतील रस्त्यांचे जाळे विणल्या प्रमाणे आयोद्योगिक विकासाचे जाळे गडकरी विणतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी गायक नितीन मुकेश यांच्या संगीताची मेजवानीदेखील भाजप कर्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आली होती.
रोजगार निर्मिती करणे हे माझ्यापुढचे लक्ष्य असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. अजून कोणतंही टार्गेट सेट केलेले नाही. नवीन योजना आणायच्या आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हा विजय सांगत गडकरींनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.