नागपूर - गरिबांना अल्पदरात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी देशात 6 मेडिकल डिव्हाईस पार्क तयार केली जाणार आहेत. त्यापैकी एक पार्क नागपूरच्या मिहानमध्ये व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यक्त केली. कठीण ऑपरेशन भारतात कुठंही होणे शक्य नाही, तेच ऑपरेशन नागपुरातील एम्स हॉस्पिटलमध्ये सहजरीत्या होईल, तेव्हाच माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होईल असेही गडकरी यावेळी म्हणाले.
....तेव्हाच माझं स्वप्न पूर्ण होईल, गडकरींनी बोलून दाखवली इच्छा - नागपूरमध्ये मेडिकल डिव्हाईस पार्क तयार
आज नागपूरमध्ये एम्सच्या दुसऱ्या फाऊंडेशन डे चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मेडिकल डिव्हाईस पार्क तयार व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
आज नागपुरातील एम्सच्या दुसऱ्या फाऊंडेशन डे च्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. खासगी रुग्णालयाबाहेरील गरिबांची गर्दी कमी करण्यासाठी नागपुरात एम्स रुग्णालयाची सुरूवात करण्यात आली आहे. गरिबांना अल्प दरात चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी देशात 6 मेडिकल डिव्हाईस पार्क तयार केली जाणार आहेत. त्यापैकी एक पार्क नागपूरच्या मिहानमध्ये व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलून दाखवली. भारतातील सर्व शहरांमध्ये एम्ससारखे रुग्णालय व्हावे, यासाठी मी आग्रही आहे. हे करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असल्यानेच पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा पर्याय शोधून काढल्याचे गडकरी म्हणाले.
जगात मोठ्या प्रमाणात भारतीय डॉक्टर आहेत. त्यांचा उपयोगसुद्धा आपल्या देशातील सेवेसाठी व्हावा, यासाठी एम्सने त्यांच्याशी समन्वय साधावा. अजूनही खेड्यात आरोग्याची मोठी समस्या आहे. त्यांना मोठा पैसा खर्च करावा लागतो. त्यासाठी एम्सचा फायदा होईल, त्यांना सुविधा मिळेल. सरकारमध्ये जेवढी चांगली सर्व्हिस द्यायला पाहिजे, ती होत नाही कारण यात अनेकांचा हस्तक्षेप असतो. मी असा हस्तक्षेप करत नसल्याचे गडकरी म्हणाले. इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये नागपूर हब झालं आहे. सिम्बॉयसिस बनलं तेव्हा आम्ही त्यांना जागा दिली आणि त्यात नागपूरच्या विधर्थ्यांना 15 टक्के जागा ठेवण्यास सांगितले. जे सगळीकडे होते तेच इथे झालं तर त्यात विशेष नाही. पण वेगळं काही केलं तरच ते जगात जाईल हे तुमच्याकडून अपेक्षित असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.