नागपूर :चार्टर्ड अकाउंटंटने कोणाच्याही बॅलन्स शीटवर स्वाक्षरी करण्यापूर्वी पुढील परिणामाचा विचार करावा. कारण एकदा चार्टर्ड अकाउंटंटने बॅलन्स शीट साइन केली म्हणजे लोक निर्धास्त होतात. नंतर मात्र काय होते हे तुम्हाला माहिती आहे. आजकाल ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स सर्व आहेत, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते नागपुरात सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कॉन्फरन्स मध्ये बोलत होते. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया द्वारे ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
'चार्टर्ड अकाऊंटंट अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ' : चार्टर्ड अकाऊंटंट्सचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रामधील विकासाचा दर वाढणे, देशात आर्थिक व्यवहार्यता (इकॉनॉमिक व्हायबिलिटी) वाढीस लागणे आणि रोजगाराच्या शक्यता निर्माण होण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट्सची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ते भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
'स्वाक्षरी करणाऱ्यालाच दोषी ठरविले जाते' : नितीन गडकरी म्हणाले की, या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मेरीटमध्ये येण्याचा प्रयत्न करावाच, पण जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करण्यावरही भर द्यावा. या व्यवसायात करियर करताना कायद्याचा सन्मान करणे, पारदर्शकता राखणे, टीम वर्कवर भर देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मकता आणि अहंकार यात अंतर ठेवणे या गोष्टी आवर्जून करायला हव्या. कुठल्याही कागदावर विचार करूनच स्वाक्षरी करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करा. कारण पुढे अडचणी उभ्या झाल्यास स्वाक्षरी करणाऱ्यालाच सर्वांत पहिले दोषी ठरविले जाते, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला.