नागपूर Nitesh Rane on Rohit Pawar : भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. रोहित पवार अजून सिनिअर केजीमध्येचं आहेत. त्यांना अद्यापही दाढी मिशी देखील फुटलेली नाही. अजून त्यांना आवाजाचा कंठ फुटलेला नाही. ते पहिल्याचं टर्मचे आमदार असून प्रणिती शिंदे यांनी त्यांच्याबद्दल काय बोललं, याकडं त्यांनी लक्ष घालावं. इतरही काही अर्वाच्य शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली. नागपूर, विदर्भाचे दौरे करण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःच्या कर्जत जामखेडमध्ये लक्ष घालावं, म्हणजे माजी आमदार लिहिण्याची वेळ येणार नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी रोहित पवार यांना लागावला आहे.
राहुल नार्वेकरांना कुणीही कायदा शिकवू नका :राज्य विधानमंडळातील 16 आमदार अपात्रतेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणेचं सुनावणी होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या विषयातील एक्सपर्ट आहेत. त्यामुळे कोणीही त्यांना कायदा शिकवण्याची गरज नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय. जेव्हा उशीर होत होता, तेव्हा त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका ठाकरे गटानं केली. त्यांची उणीदुणी काढली, त्याच राहुल नार्वेकर यांच्यापुढं जाऊन आज बसावं लागत आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून 2024 पर्यंत हे सरकार सक्षम आणि ताकदीनं चालणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
जरांगे पाटील अहंकार बाळगणार नाहीत : मनोज जरांगे पाटील हा तळागाळात संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. कुठल्या विषयाचा अहंकार ते करणार नाहीत. समाजाचं हित काय हे मनोज जरांगे पाटलांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. सरकार योग्य पद्धतीनं मराठा समाजाला फायदा होईल, त्या गोष्टी करणार असल्याचा विश्वास त्यांना आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले. समाजाच्या सगळ्या घटकांना हे आपलं सरकार आहे असं मी सांगेन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा, असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.