नागपूर:पहाटे चार वाजताच्या सुमारास एनआयएचे पथक आज नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतरंजीपुरा भागातील बडी मजीद भागात दाखल झाले होते. एनआयएच्या पथकात एकूण 20 ते 22 अधिकारी सहभागी होते. पाकिस्तानातील काही कट्टरतावादी गटांशी संबंध असल्याच्या कारणावरून 'नॅशनल इन्वेस्टींगेशन एजन्सी'च्या पथकाने नागपुरात दोन ठिकाणी धाडी टाकून तिघांची चौकशी केल्याचे निष्पन्न झाले आहे. बडी मशीद जवळ राहणारे अहमद, अख्तर आणि अब्दुल नामक या तिघांची कसून चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतसुद्धा 'एनआयए'च्या पथकाने एकाची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. तिघेही जमात-ए-रजा नामक संघटनेशी संबंधित असून या संघटनेच्या मोरक्याचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण: नॅशनल इन्वेस्टींगेशन एजन्सीच्या पथकाने ज्या तिघांची चौकशी केली आहेत ते पाकिस्तानच्या काही कट्टरपंथी गटाच्या संपर्कात होते. 2017 पासून ते व्हाट्सएपच्या चॅटिंगच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती देखील पुढे आली. एनआयएच्या टीमने सबळ पुराव्याच्या आधारे आज गुरुवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान नागपुराती मुस्लीमबहुल भागांमध्ये कारवाई केली आहे. संशयास्पद चॅटिंगच्या आधारे 'एनआयए' पथकाने तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून स्लीपर सेल सक्रिय करण्याचा डाव:पाकिस्तानमधून संचालित आणि नियंत्रित केल्या जाणाऱ्या गझवा-ए-हिंद मॉड्यूलच्या सदस्यांविरुद्ध पटण्यातील फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यामध्ये जुलै २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानी नागरिकाने सुरू केलेल्या 'गझवा-ए-हिंद' या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन मरघूब अहमद दानिश उर्फ ताहिर याला या प्रकरणात अटक करण्यात आली. मरघूब याने व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि बीआयपी मेसेंजरसह वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'गझवा-ए-हिंद' चे वेगवेगळे गट तयार करून नेटवर्क सुरू केले होते. त्याने बांग्लादेशी नागरिकांसाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुप देखील तयार केला होता. त्याने भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश आणि येमेनमधील अनेकांना या गटांमध्ये सामील केले होते. भारतीय तरुणांना कट्टर बनवण्याचा या मॉड्यूलचा उद्देश आहे. 'गझवा-ए-हिंद' या गटातील सदस्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी 'स्लीपर सेल'मध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने कट्टरतावादी बनवले जात होते, असे तपासात समोर आले आहे. दरम्यान, एनआयएने मरघूब विरोधात जानेवारीमध्ये आरोपपत्र दाखल करुन पुढील तपास सुरू ठेवला आहे.