नागपूर - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पुन्हा नव्याने 31 नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटलमध्ये (डीसीएच) परावर्तीत होणार आहे. यासंदर्भातील एक आदेश नागपूर महानगरपालिकेने निर्गमित केला आहे. यानुसार २४ तासांत संबंधित रुग्णालयांकडून सदर रुग्णालय कोव्हिड रुग्ण दाखल करुन सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे आता डीसीएच रुग्णालयांची संख्या एकुण 62 झाली आहे.
या आदेशात नमूद केल्यानुसार, 24 तासांत रुग्णालयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील 48 तासांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित रुग्णालयांना भरती करता येतील. जे रुग्ण दाखल होतील. त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावा, असेही आदेशात नमूद आहे. तसेच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाईम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्यावत करणे अनिवार्य राहील.
नागपुरमधील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 हजार इतकी आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांना बेडच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यातच दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत असल्याने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे आता शहरातील आणखी
31 नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटलमध्ये परावर्तीत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.