नागपूर -'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून देशभरात वाद निर्माण झालाय. या पुस्तकाच्या निषेधार्थ आणि भाजपने माफी मागावी या मागणीसाठी राज्यभरात काँग्रेसने आंदोलन केले. नागपुरातही आज(मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या पुस्तकाचा भाजपशी संबंध नसल्याचे मानव संसाधन मंत्री प्रकाश जवडेकरांनी म्हटले होते. भाजप बॅकफूटवर गेल्यानंतर काँग्रेसने आपल्या आंदोलनाची धार तेज केली आहे. ते खोट बोलत असून या पुस्तकाचे विमोचन भाजप कार्यलयात करण्यात आले असून त्यांचा भाजपशी थेट संबध असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याने काँग्रेसतर्फे निदर्शन करण्यात आली. इतकेच नव्हे तर, मोदींची तुलना माकडासोबत करत मोदी हे माकडचेष्टा करतात असा आरोप देखील काँग्रेस नेत्यांनी केला. या पुस्तकावर बंदी न आणता हे पुस्तक समूळ नष्ट करण्यात यावं, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. तसेच, शिवाजी माहाराजांच्या मागे सिंहाचे चित्र आणि मोदींच्या मागे माकडाचे चित्र असलेले फलकही आंदोलनात झळकले.