नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मला देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल वाईट वाटतं आहे. त्यांना आज एकनाथ शिंदे यांची राक्षसी महत्वाकांक्षी किती आहे हे कळालं असेल', असे ते म्हणाले.
'भाजपने शिंदेंसोबत जाऊन चूक केली' : जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी आगामी निवडणूक एकत्र लढल्यास राज्यात किमान 200 जागा जिंकू शकते. एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपने फार मोठी चूक केल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचा निकाल लागला त्यावेळीच मी सांगितलं होतं की हे सरकार गेलं आहे. जेव्हा संविधानाच्या विरोधात जाऊन कुणीही सत्तेत बसतो, त्यावेळी जनतेचा त्यांच्यावर प्रचंड राग असतो, असे ते म्हणाले.
'राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ निहाय आढावा' : जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सध्या राज्यात मतदारसंघ निहाय आढावा घेतो आहे. राज्यात सरकार विरोधी वातावरण निर्मिती झाली आहे. पक्षाकडून त्याची माहिती घेतली जाते आहे. शरद पवार यांना प्रत्येक मतदारसंघाचा पॉलिटिकल सेन्स आहे. भाजप सोबत शिवसेनेचे 40 आमदार आहेत म्हणून भाजप सत्तेत आहे, असे गजानन कीर्तिकर म्हणाले असतील तर ते अगदी खरं आहे. ते भाजपला किती कमी लेखत आहेत याचा अंदाज घ्या. कीर्तिकारांनी लोकसभेला उभे राहावं म्हणजे मग त्यांना समजेल, असे आव्हाड म्हणाले.
'मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही' : जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असे म्हटले आहे. आधी पुढच्या 57 दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागला आहे त्यावर निर्णय द्यावा लागणार आहे, असे ते म्हणाले आहेत. निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महापुरुषांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो लावला हा त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. दुसऱ्या देशात गेले की पंतप्रधान महात्मा गांधींवर फुलं उधळतात, प्रत्येक देशात त्यांचाच फोटो दिसतो. हा गांधींचा देश आहे, नथूराम या देशाची ओळख नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा :
- Eknath Shinde : 'फोटो असो किंवा नसो, लोकांच्या मनात आम्हीच' ; जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- Ajit Pawar : जाहिरातबाजीने शिंदेनी स्वत:चं हसं केलं - अजित पवार