नागपूर : मौदा-माथनी महामार्गावरील रस्त्यांना मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. ज्यामुळे अनेक अपघात घडत असताना ते खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याऐवजी टोल नाक्यावर अवैध वसुली केली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष शिवराज गुजर व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी काही वेळ रस्ता देखील अडवून धरला होता. ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.
'बेशरम टोल नाका'
टोल नाक्यावर सुरू असलेल्या अवैध वसुलीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील मथनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला. या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याचं काम टोल वसूल करणाऱ्या कंत्राटदाराचं आहे. मात्र खड्डे न बुजवता टोल वसुली सुरूच आहे. त्यामुळं या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी टोल नाक्यावर 'बेशरम टोल नाका' असा फलक लावून निषेध करण्यात आला.