नागपूर : बारावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे, मात्र या यशात राजुला हिदामी या विद्यार्थिनीने पास होत 45.83 टक्के गुण मिळवले. मात्र या 45.83 टक्के गुण मिळवण्यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. राजुला हिदामी या 15 वर्षाच्या आदिवासी मुलीने गडचिरोली गोंदियात मोठी दहशत निर्माण केली होती. इतक्या कमी वयात राजुला हिदामीच्या नावावर तब्बल 6 गंभीर गुन्ह्याची नोंद होती. मात्र तिच्या जीवनात संदिप आटोळे या पोलीस अधिकाऱ्यामुळे प्रकाश आला आणि तिने हातातील शस्त्र खाली टाकले. पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानंतर राजुलाने पुन्हा शिक्षणाची कास धरली. तिच्या यशाची ही संघर्षगाथा खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.
कोण आहे राजुला हिदामी :राजुला हिदामी ही गोंदिया आणि गडचिरोली परिसरातील जहाल नक्षलवादी होती. वयाच्या सहाव्या वर्षीच राजुलावर तब्बल 6 गुन्हे दाखल होते. यात पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार गोळीबार प्रकरणासह लुटमार आणि स्फोटांच्या घटनांचाही समावेश आहे. वयाच्या 15 व्या वर्षीच राजुला नक्षल चळवळीत का काम करत होती, याचे कोडे पोलिसांनाही उलगडले नव्हते.
पोलीस अधीक्षक संदिप आटोळेंनी स्वीकारले पालकत्व :राजुला हिदामी या 15 वर्षाच्या मुलीची नक्षलग्रस्त परिसरात चांगलीच दहशत पसरली होती. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तर राजुलाचा चांगलाच दबदबा होता. मात्र गोंदिया पोलीस दलाच्या अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संदिप आटोळे यांनी या प्रकरणी चांगलेच लक्ष घातले. संदिप आटोळे यांनी राजुलाचे मनपरिवर्तन करण्यात यश मिळवले. त्यांच्याच प्रयत्नांनी राजुलाने 2018 मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण करत बंदुक खाली ठेवली. त्यानंतर राजुलाने शिक्षणाची कास धरली. संदिप आटोळे यांनी राजुलाचे पालकत्व स्विकारुन तिच्या शिक्षणाचा सगळा भार उचलला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच राजुला बारावीच्या परीक्षेत पास झाली आहे. आगामी काळातही राजुलाला मदत करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांनी उचलली आहे. राजुलाने मिळवलेल्या यशाबद्दल आपल्याला आनंद झाला आहे. तिला केलेल्या मदतीचे समाधान असल्याची माहितीही त्यांनी ईटीव्ही भारत प्रतिनिधींसोबत बोलताना दिली आहे.