नागपूर - शहराचे नावलौकिक संपूर्ण देशात वाढवणाऱ्या 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालया'च्या नव्या प्रशस्त इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री झाल्यावर अमित शाह पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत हे विशेष.
अग्निशमन सेवेसंदर्भात अभ्यासक्रम व प्रशिक्षण चालवण्यासाठी १९५० मध्ये उत्तर प्रदेशच्या रामपूर येथे राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. परंतु, भौगोलिक परिस्थिती व इतर सुविधांचा विचार करून ही संस्था १९५६ मध्ये नागपुरात हलवण्यात आली. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात आत्तापर्यंत हे महाविद्यालय कार्यरत होते. परंतु, मोठ्या व विस्तीर्ण जागेची आवश्यकता भासू लागल्यावर राजनगर परिसरात या संस्थेच्या जागेच्या विकासाला २०१० साली मान्यता देण्यात आली.