नागपूर - नागपूर शहरात गंभीर गुन्हे दिवसागणिक घडत असतात. त्यामुळेच दुर्दैवाने नागपूरला क्राईम कॅपिटल शहर म्हणून देखील ओळख मिळाली आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूरने गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा नागपूरने हे स्थान अबाधित ठेवले आहे. या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकतं नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळी सुरू केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले आहे.
नागपूर शहरात वर्षाकाठी सरासरी शंभर खुनाच्या घटना घडतात आणि संख्या गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटणा, लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांपेक्षा अधिक आहे. राज्यातील पुणे दहाव्या स्थानावर तर मुंबई १६ क्रमांकावर आहेत. त्यामुळे आता नागपूर शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे या प्रश्नाचे उत्तर नागपूर पोलिसांनी द्यायलाच हवे.
नागपूर शहर कायम गंभीर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. नागपूरकर जनतेसाठी आणि पोलीस यंत्रणेसाठी सुद्धा ही काही गौरवाची बाब नाही. मात्र आता नागपूरने गुन्ह्यांच्या बाबतीत देश पातळीवर गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहार राज्यातील पाटणा, उत्तर प्रदेश मधील लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांना मागे टाकत असल्याचे आकडे समोर आल्याने गृहमंत्रालासह पोलिसांची चिंता देखील वाढली आहे. यासंदर्भात शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे वेगळेच तर्क आहेत. त्यांच्या मते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोकडे नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाख असल्याची नोंद आहे. मात्र नागपूर शहराचा विस्तार झाला आहे. ग्रामीण नागपूरचे अनेक भागांचा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत समावेश झालेला आहे. त्यामुळे दर एक लाख लोक संख्येमागे हत्या प्रकरणात नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर दाखवत असले तरी पोलीस आयुक्तालयाचा झालेल्या विस्तराचा या मध्ये विचार करण्यात आलेला नसल्याचं ते म्हणाले आहेत.
नागपुरात हत्येच्या प्रकरणाचे दर ३.९ टक्के-
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वर्ष २०२० च्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणाचे दर ३.९ टक्के एवढे असून हे देशात सर्वाधिक आहे. या अहवालानुसार २०२० मध्ये बिहारची राजधानी पाटणा मध्ये हत्येचे ७९ प्रकरण नोंदवले गेले असून दर एक लाख लोकसंख्या प्रमाणे पाटण्यात हत्येचे दर ३.८५ आहे. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणासंदर्भात नागपूरने यंदा पाटण्याला ही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी यासंदर्भात नागपूरचे स्थान पाटण्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर होते.गेल्या वर्षी २०१९ मध्ये नागपूरात हेच दर ३.६ टक्के होते ते पटण्यात हे दर ४.९ टक्के एवढे होते.म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात पाटणाने स्थिती सुधारली आहे तर नागपुरात स्थिती आणखी बिघडली आहे.