नागपूर :मध्य भारतातील कर्करुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या जामठा परिसरात तयार झालेल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (एनसीआय) उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे,त्यामुळे उर्वरित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे.
राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे उद्घाटन दुर्धर आजारावर प्रभावी वैद्यकीय उपचार :धर्मादाय तत्वावर काम करणाऱ्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती गौतम अदानी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती होते. राष्ट्रीय कर्करोग संस्थेचा एकूण 25 एकरचा परिसर आहे. या रुग्णालयात 470 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी रुग्णसेवा सुरू असून अल्पावधीतच दुर्धर आजारावर प्रभावी वैद्यकीय उपचार सुरू झाले आहेत.
राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे उद्घाटन
रतन टाटा यांच्या हस्ते लोकार्पण :१८ ऑगस्ट २०१२ रोजी संस्थेच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली होती. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपुजन करण्यात आले. २०१७ मध्ये पहिल्या टप्प्याचे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. २०१८ मध्ये २८ बाल रुग्णांसाठीचा स्वतंत्र असा वॅार्ड सुरू करण्यात आला. २०२० मध्ये विप्रोचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या संस्थेला भेट देत पाहणी करीत कौतुक केले होते. कर्करोगाविषयीची महिलांच्या मनातील भीती नष्ट व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोगावर मात केलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या संस्थेचा कॅन्सरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
हेही वाचा : CM Eknath Shinde News: दौऱ्यावर असूनही मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीने केला ६५ फाईल्सचा निपटारा; आज घेणार अमित शाहंची भेट