नागपूर : महाठग अजित पारसेला नागपूर पोलीस बेड्या केव्हा ठोकतील (Ajit Parase Police Arrest) का, असा एक प्रश्न सर्वसामान्य नागपूरकारांच्या मनात घोंघावत आहे. लहान गुन्हा घडला किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्परतेने कारवाई करणारे नागपूर पोलिसांनी इतक्या संयमाची भूमिका घेण्यामागील कारण काय हा देखील प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. नागपूर शहरातील होमिओपॅथी डॉक्टरला साडेचार कोटी रुपयांनी गंडा (Homeopathy doctor defrauded) घालून फसवणुकीच्या आरोपात अडकलेला महाठग अजित गुणवंत पारसेला अतिशय गंभीर आजाराने ग्रासलेले (Ajit Parse seriously ill)आहे. जोपर्यंत तो पूर्णतः बरा होत नाही तोपर्यंत त्याला अटक केली जाणार नाही असं पोलिसांचे म्हणणे आहे.
असा घडला एकूण घटनाक्रम: होमिओपॅथी डॉक्टरच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी अजितच्या निवासस्थानी धाड टाकली होती. त्यावेळी तो गंभीर आजराने ग्रासले असल्याने त्याला अटक करणे शक्य नसल्याने पारसेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार दिवस उपचार झाल्यानंतर सुट्टी मिळाल्यानंतर घरी परतला. तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. तिथेसुद्धा अजित पारसेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची अटक लांबणीवर पडली आहे.
साडेचार कोटींची फसवणूक:नागपूरच्या महाल परिसरातील डॉक्टर राजेश मुरकुटे असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी डॉक्टर मुरकुटे यांची अजित पारसेची २०१९ मध्ये ओळख झाली होती. तेव्हा डॉक्टरने होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्याचा मानस असल्याचे अजित पारसेला सांगितले. माझी मुंबई,दिल्लीसह देशातील अनेक राजकीय पक्षातील नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याचं सांगून तुम्हाला परवानगी मिळवून देतो असे सांगून स्वतःच्या जाळ्यात ओढले. गेल्या दोन वर्षात अनेक कारणे सांगून आरोपीने डॉक्टरकडून सुमारे साडेचार कोटी रुपये वसूल केले. स्वतःची फसवणूक झाल्याचे समजताच डॉक्टर मुरकुटे यांनी कोतवाली पोलीस अजित पारसे विरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.