नागपूर - पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून त्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. प्रशासनाने वेळीच पावसाचे अलर्ट दिले नसल्याचे आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात जीवितहानी झाल्याची एकही घटना घडली नसल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी म्हटले आहे. याद्वारे त्यांनी भाजपा नेत्यांनी केले आरोप फेटाळून लावले आहेत.
दोन दिवसांपूर्वी नागपूरसह पूर्व विदर्भात आलेल्या पुराने हाहाकार माजवला आहे. मध्यप्रदेश येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नद्याध्ये अचानक आलेल्या पुरामुळे १० हजार कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले आहे. तर एक लाख एकरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने लोकांना वेळीच अलर्ट दिले नाहीत म्हणून हे नुकसान झाले आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला होता. शासनाने आता लवकर पंचनामे करत हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे आणि काही आमदारांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली होती.