नागपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आज काँग्रेस पक्षाकडून देशभरात सत्याग्रह आंदोलन केले जात आहे. नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. चोराला चोर म्हणणे जर चुकीचे असेल तर काँग्रेस ही चूक वारंवार करणार, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र अदानीला कशी मदत करतात यासंदर्भात राहुल गांधी लोकसभेत खुलासा करणार होते, म्हणूनच त्यांची सदस्यता रद्द करण्यात आली, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
नागपूरात सत्याग्रह आंदोलन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे षड्यंत्र भाजपनेच घडवून आणले आहे. फक्त न्यायालायचे नाव पुढे केले असल्याचे ते म्हणाले आहेत. आम्ही इंग्रजांना घाबरलो नव्हतो तर यांना काय घाबरणार आहोत. भाजप विरोधातीलल आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. भाजपच्या हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठीचे सत्याग्रह आंदोलन आम्ही आजपासून करू, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
अदानी प्रकरणावरून टीका : नाना पटोले यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पटोले म्हणाले की, मी गावगुंड मोदी संदर्भात बोललो होतो, तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोचले. जेव्हा तो गाव गुंड आणि त्याची पत्नी समोर आली तेव्हा भाजपने आपले आंदोलन थांबवले होते. अदानीचे नाव घेतले तर यांना त्रास का होतो, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.