नागपूर: एज इज जस्ट ए नंबर म्हणतात ते खरं आहे. मकरंद कुलकर्णी. वय वर्षे 54, परंतु फिटनेस मात्र,विशीतल्या तरुणांना लाजवेल अशीच आहे. मकरंद कुलकर्णी न चुकता रोज सकाळी पाच वाजता विद्याविहार येथील शरद भाके क्रिकेट अकॅडमी मध्ये दाखल होतात. तिथे प्रथम जॉगिंग, मग वॉर्मअप नंतर नेट मध्ये बॅटिंगचा सलग दोन तास कसून सराव ही मागील चार दशकांपासून मकरंद कुलकर्णी यांची दिनचर्या आहे. म्हणूनचं आज मकरंद कुलकर्णी यांची पन्नास वर्षावरील क्रिकेट वर्ल्ड कपच्या टीम इंडियामध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून निवड झाली आहे.
मकरंद कुलकर्णी यांची कार्यकिर्द:मकरंद कुलकर्णी यांनी 50 च्या आंतर-झोनल स्पर्धेत 51.6 च्या सरासरीने 258 धावा करत वेस्टर्न लायन्सच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे मकरंद कुलकर्णीची भारत ओव्हर 50 क्रिकेट संघासाठी खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी विजय मर्चंट (U-15) ट्रॉफी, नागपुरातील शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेट आणि नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व अशा विविध स्तरांवर खेळले आहे. 1991 मध्ये विद्यापीठ संघाचे कर्णधारपदही भूषवले आहेत. या व्यतिरिक्त त्याला नागपूरमधील आघाडीच्या क्लबमध्ये आणि मध्य विभागातील विदर्भ वेटरन्स क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. कुलकर्णी यांच्या नावावर फलंदाज म्हणून 21 अर्धशतके आणि 6 शतके आहेत आणि गोलंदाज म्हणून त्यांनी 15 पेक्षा जास्त वेळा एका डावात 5 बळी घेतले आहेत.
संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब:म्हणतात ना "भगवान के घर देर है अंधेर नही है" मकरंद भाऊ चे साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन शहरात 06 ते 20 मार्च दरम्यान होणाऱ्या पन्नास वर्षावरील क्रिकेट वर्ल्ड कप च्या टीम इंडिया मध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून निवड झालेली आहे. पन्नास वर्षांवरील वय असलेल्या खेळाडूंच्या या वर्ल्डकप मध्ये जगभरातून 13 देशांतील दिग्गज खेळाडू सहभागी होत आहेत. भारताकडून पाठविल्या जाणाऱ्या क्रिकेट टीम मध्येही अनेक दिग्गज खेळाडू आहेत. यात मकरंद कुलकर्णी यांना स्थान मिळणे हे संपूर्ण विदर्भवासियांकरिता अतिशय अभिमानाची बाब आहे.