नागपूर- जिल्ह्यात कीड आणि रोगामुळं सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेले. त्यानंतर आता धानपीक हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. सध्या धानपिकावर करपा, तुडतुडे आणि मावा किड्यांचा प्रचंड प्रादुर्भाव आहे. या रोग आणि किड्यांमुळे धान पीक करपत चालले आहे. काही दिवसांनी धानपीक काढणीला येणार आहे. मात्र, या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हाती येणारे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात; पिकावर कीड, करपा रोगाचा प्रादुर्भाव - धान पिकावर करपा रोग
नागपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची नासाडी झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाच आता धान पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. तसेच करपा रोगामुळे धानाचे पीकदेखील हातचे वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे एकीकडे संपूर्ण उद्योग धंदे संकटात आलेले असताना शेती व्यवसायाला सुद्धा मंदीची झळ बसलेली आहे. सर्व संकटांवर मात करत विदर्भातील शेतकऱ्यांनी शेती पिकवली खरी, मात्र त्यावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे त्यांच्या समोर मोठं संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन ते तीन वेळा फवारणी केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी यंदा शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
पिकांच्या नुकसानी संदर्भात कृषी विभागाला माहिती देण्यात आली आहे. मात्र, कृषी विभागाने रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा सल्ला शेतकाऱ्यांना दिला. त्याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही. दरवर्षी विदर्भातील शेतकरी मोठ्या उमेदीने शेती पिकवतो. मात्र अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करताना त्यांचे कंबरडे मात्र दरवर्षीच मोडले जात आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट गडद होत असताना आता शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन पुन्हा उभं करावे, अशी आशा बळीराजा करत आहे.